2 Chronicles 11

1यरुशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली.

2पण परमेश्वराचा माणूस शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला, 3“शमाया, यहूदाचा राजा, शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल तसेच यहूदा आणि बन्यामीन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे. 4परमेश्वराचे म्हणणे असे आहे आपल्या बांधवांशीच लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यराबामावर त्यांनी हल्ला केला नाही.

5रहबाम यरुशलेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात बाधली. 6बेथलेहेम, एटाम, तकोवा, 7बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम, 8गथ, मारेशा, जीफ, 9अदोरइम, लाखीश, अजेका, 10सोरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामीन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली.

11किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला. 12प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामीन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.

13सर्व इस्राएलामधील याजक आणि लेवी रहबामाशी सहमत होते. ते त्याला येऊन मिळाले. 14लेवीनी आपली शेती आणि मालमत्ता सोडली आणि ते यहूदा व यरुशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे पुत्र यांनी लेवीना हाकलून लावले म्हणून ते आले. 15यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ति उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.

16इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवीनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमेला आले. 17त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.

18रहबामाने महलथाशी विवाह केला. तिचे पिता यरीमोथ आणि तिची आई अबीहईल. यरीमोथ हा दावीदाचा पुत्र. अबीहईल अलीयाबची कन्या आणि अलीयाब हा इशायचा पुत्र. 19महलथापासून रहबामाला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे पुत्र झाले.

20मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले. 21रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामाला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस पुत्र आणि साठ कन्याहोत्या.

22अबीयाला रहबामाने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्याला राजा करावे अशी त्याची इच्छा होता. रहबामाने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व पुत्रांना यहूदा आणि बन्यामीन येथील भक्कम तटबंदी असलेल्या नगरांमध्ये विखरून ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.

23

Copyright information for MarULB